Monday, September 16, 2019

लग्नासाठी जॉब...

रितेश, माझ्या ऑफिस मधला एक मुलगा... थोडा वेगळाच... सभ्य, आज्ञाधारक (आजकालच्या तरुणांपेक्षा जास्तच), थोडा emotional, देवावर प्रचंड श्रद्धा... अकोला चा आहे , इथे नोकरी साठी घर घेऊन राहतो एकटाच.... सगळ्यात जास्त अश्चर्य या गोष्टीचं वाटलं की तो स्वतः चा डबा स्वतः बनवून आणतो अणि रात्री सुद्धा स्वतः बनवून खातो ... त्यात त्याला बरेच वेगवेगळे पदार्थ सुद्धा येतात... मला कौतुक वाटलं...

एकदा जेवताना सहज कोणी म्हणलं,
"याचं लग्न झालं की बायकोची मजा आहे... हा खूप मदत करेल..."
तो पण बोलला, "हो करावीच लागेल, जॉब करून घर कसं सांभाळणार ना मग?"

तेव्हा काही लोक हसले, त्यात काय तू मुलगा असून बायकांची कामे करतो ही भावना... काहीजणांनी तर तसं स्पष्ट बोलून पण दाखवलं... एक मुलगा म्हणाला,
"बायकोला अजिबात सांगू नको तुला स्वैपाक येतो नाहीतर ती तुलाच सगळे करायला लावेल."

काही महिन्या नंतर परत हाच विषय झाला...
यावेळी त्याची प्रतिक्रिया, "मी नाही करणार काही काम. मी हे केलं तर ती काय करेल दिवसभर घरी? तिला काही काम नको का?"

"अरे पण तू नोकरी करणारी बायको करणार होता ना..."

"नाही, घर सांभाळणारी करेन"

जाऊदे, बदलले असतील त्याचे विचार, priority असेल आता वेगळी....

मागच्या आठवड्यात तो घरी जाऊन आला, कुणीतरी त्याला चिडवले,
"मुलगी पाहायला गेला होता का?"

" नाही रे. आधी आई बाबा पसंत करतील मग मी जाऊन पाहीन." (कुणी काही मजेत बोलले तरी तो सिरियस reply देतो)

"अरे, पण तुला पसंत पडणे जास्त महत्वाचं आहे ना... शेवटी तुझ्या सोबत राहणार ती."

"नाही, मी फक्त लग्न होईपर्यंत जॉब करणार आहे. त्यानंतर घरी जाऊन शेती करेन."

" तिला लग्नाआधी ते सांग म्हणजे झालं " एवढे बोलून आम्ही हात जोडले... 🙏🏻🙏🏻🙏🏻

Sunday, September 8, 2019

अपेक्षा


गेल्या 15 ते 20 वर्षापासुन tv चे फॅड खूपच वाढले अणि त्यावरच्या serials ने सुनेची एक प्रतिमा निर्माण केली आहे. सून एकदम छान, सगळ काम करणारी, मिळून मिसळून वागणारी, मान ठेवणारी, प्रसंगी नोकरी करणारी, देवाचे व्रत etc करणारी, कर्तव्यतत्पर, सगळ्यांना मदत करणारी, नवऱ्याचे सगळे काम करणारी, स्वभावाने चांगली, लोभस, हलक्या आवाजात बोलणारी, सासू सासरे यांचे सर्व ऐकणारी, सौभाग्याचे सगळे दागिने घालणारी, नेहमी साडी नेसली तर उत्तमच... In short सगळे गुण असणारी.... या प्रतिमे मध्ये ती बसली की सून चांगली... नाहीतर काही विचारू नका..

अरे पण हे सगळं कसं जमेल एका व्यक्तीला? बर जमलं तरी सगळे तसे नसतात ना... एखाद्या व्यक्तीचा स्वभाव नसेल मिळून मिसळून रहायचा... त्यांना एकटं रहायला आवडत असेल तर काय वाईट आहे त्यात? एखादी नसते सगळ्या कामामधे पटाईत... एखादी धार्मिक नसते, तिचा नसतो विश्वास कर्मकांड, उपवास, व्रत यावर ... एखादीला नाही आवडत साडी नेसायला, नेहमी सगळे दागिने घालायला, कुणाला नाही जमत जॉब करून घर नीट सांभाळायला, आठवड्यात एक दिवस सुट्टी मिळाली की त्या दिवशी लोकांचा पाहुणचार करायचा येतो कंटाळा, कुणाचा आवाज नसतो सॉफ्ट, भाषा असते कधी थोडी कमी sophisticated , एखादी करते अपेक्षा की नवऱ्याने रोज जाताना त्यांचा रुमाल, पाकीट घ्यावे स्वतःहून.. कुणाला नाही पटत स्वतःची मते बाजूला ठेवुन दुसर्‍यांचं ऐकायला...
म्हणुन ती व्यक्ति वाईट असते का? त्यांनी नेहमी दुसर्‍याचे ऐकत स्वतः च्या मनाविरुद्ध वागत, आपलं व्यक्तिमत्व, विचार, मते बाजूला ठेवुन जगायचे का? यामधे जॉब च्या ठिकाणी असणार्‍या जबाबदार्‍या, तिथले काम हे अजून वेगळेच....
बर आजकालच्या जमान्यात या अपेक्षा अणि घरच्या व आर्थिक जबाबदार्‍या वाढतच चालल्यात... हे सगळे जमायला इथे कोणी सुपरवुमन नाहिये.
जसा आपला स्वभाव असतो तसा समोरच्या माणसाचा ही असतो. तो स्वभाव वेगळा असला तर तो चुकीचा अणि मी बरोबर असे ठरवुन मोकळे का व्हायचे?
- हर्षदा गुरव.
Image: Google